गोंदिया-आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याच्या कारणाने राज्यभरातील हजारो निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे.या संपात जिल्ह्यातील 90 ते 100 डॉक्टरांचा समावेश आहे. मागील अनेक दिवसांपासून सरकार प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या बाबतीत डॉक्टर संघटनेला त्यांच्या मागण्यानुसार फक्त आश्वासन देत आहे.मात्र त्यांना पुर्णत्वास नेण्यास असामर्थता दाखवत आहे. या विषयाची नाराजी दाखवत डॉक्टरांनी राज्यभर संप पुकारला आहे.
यातील प्रमुख मागण्यांमध्ये वेतनवाढ,राहण्यासाठी हॉस्टेलच्या सुयोग्य सोयी सुविधा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षकांची निवड करणे अशा मागणीचे निवेदन त्यांनी केटीएम सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना दिले.यापुढे ओपीडी व आयपीडीच्या सेवांना सदर डॉक्टर सहकार्य करणार नाही.त्यामुळे जिल्हासहित राज्याच्या स्वास्थ्य सेवेवर विदारक परिणाम दिसून येतील यात शंका नाही.यातील शिकाऊ डॉक्टरांना विद्यावेतनही वेळेवर मिळत नसल्याने व त्यांना इतर कोणताही आर्थिक आधार नसल्याचे त्यांनी त्यांच्या दैनंदिन गरजा कसे भागवाव्या याविषयी सरकार गंभीर दिसत नाही अशी शंका निवासी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. राहण्यासाठी असलेले तात्पुरते हॉस्टेलमध्ये एका खोलीत कमीत कमी 4 ते 5 डॉक्टरांना राहावे लागत आहे.त्यात त्यांच्या स्वतंत्र जीवनशैलीवर फरक पडून मानसिक स्वस्थावर परिणाम दिसून येत आहे.
यापूर्वी 7 फेब्रुवारी पासून निवासी डॉक्टरांच्या संघटनेने संपावर जाण्याची तयारी दर्शविली होती मात्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी येते दहा दिवसात तुमची समस्या मार्गी लावतो असे दिलेले आश्वासनामुळे संप मागे घेण्यात आला होता मात्र,ती समस्या अजून पर्यंत पुर्ण न झाल्यामुळे केटीएस सहित महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेतर्फे पुन्हा संप करण्यात येत आहे असे उपस्थित डॉक्टरांनी सांगितले यावेळी उपस्थित डॉक्टरांनी कॅण्डलमार्च काढून सरकारला कडक असा जाहीर इशारा दिला आहे.