“बुद्ध आणि त्याचा धम्म” या ग्रंथात असे लिहिले आहे की, सिद्धार्थ यांचा जन्म शाल वृक्षाच्या छायेखाली झाला. त्यांची माता महामाया देवी या माहेरी देवदहनगरीला जाताना वाटेत लुम्बिनी वनात थांबल्या. तेव्हा तेथील एका दाट शाल वृक्षाच्या बुंध्याखाली त्या चालत गेल्या. त्याचवेळी त्यांनी वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हेलावत असलेली एक फांदी धरली. आणि त्याच अवस्थेत त्यांनी मुलाला जन्म दिला. शाल वृक्षांच्या सानिध्यात सिद्धार्थाचा जन्म होणे ही एक अदभूत घटना होती. तसेच आयुष्याच्या अंतिम काळी सुद्धा ते कुशीनारा येथील शालवृक्षांच्या उपवनात होते. आनंदला त्यांनी दोन शाल वृक्षांच्यामध्ये पहुडण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आणि रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी महापरिनिर्वाण होईल असे सांगितले. त्याप्रमाणे रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण शाल वृक्षांच्या सानिध्यात झाले. जन्म शालवृक्षांच्या खाली आणि महापरिनिर्वाण देखील शाल वृक्षांच्या खाली होणे ही जगातील अदभूत घटना होती. यास्तव बोधिवृक्षा प्रमाणे शाल वृक्षाचे महत्व देखील बौद्ध जगतात अधोरेखित झाले आहे.असा हा साल वृक्ष भारतीय उपखंडात हिमालय, मॅनमार पासून ईशान्येकडील नेपाळ, बांगलादेश आणि भारतातील अनेक राज्यात (आसाम, बंगाल, ओरिसा, झारखंड आणि पश्चिमेकडे हरियाणामधील शिवलिक टेकड्या पर्यंत ) आढळतो. शाल वृक्षाला उत्तर भारतामध्ये ‘सखुआ’ असे म्हणतात. तसेच हा वृक्ष छत्तीसगड आणि झारखंड यांचा राज्यवृक्ष आहे. हा वृक्ष ३० ते ३५ मी. उंच वाढतो आणि त्याचा घेर २ मी. ते काही ठिकाणी २.५ मी. पर्यंत आढळतो. याची हिरवीगार पाने १० ते २५ सें.मी. लांब असतात आणि १० ते १५ सें.मी. रुंद असतात. तसेच याला पिवळी फुले येतात. मे-जून महिन्यात यास मातकट रंगाची फळे येतात व ती औषधोपचारासाठी वापरतात. हिमालयाच्या पायथ्याशी ही झाडे जास्त प्रमाणात दिसतात. महाराष्ट्रात मात्र शाल वृक्ष कुठे बघितल्याचे आढळून येत नाही.हा कायम बहरलेला वृक्ष आहे. हिंदू धर्मामध्ये या वृक्षाला विष्णूचे रूप मानले जाते. जैन धर्मामध्ये २४ वे तीर्थकार महावीर यांना शाल वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली असे म्हटले आहे. श्रीलंका, थायी देशांबरोबर इतर थेरवादी बौद्ध देशांत अनेक विहारामध्ये हे वृक्ष दिसून येतात. शालभांजिका शिल्प हे मुळात शालवृक्ष आणि महामाया यांचे शिल्प आहे. प्राचीन भारतीय उत्सवाचे ते प्रतीक आहे. शाल वृक्षाचे खोड टिकाऊ आणि मजबूत असून इमारतीच्या बांधकामात, दरवाजे, खिडक्या आणि फर्निचरमध्ये ते वापरले जाते. तसेच हे खोड सागाच्या लाकडापेक्षा वजनदार आणि मजबूत असल्याने ते कापणे कठीण जाते. तसेच त्यास कीड, वाळवी देखील लागत नाही. ओरिसा राज्यात ७५ लाख झाडे साल वृक्षाची आहेत असे १२ मार्च २०१९ च्या इंडियन एक्सप्रेसमध्ये आले आहे.१५ एप्रिलला (चैत्र शुक्ल तृतीया) झारखंडमध्ये शाल वृक्षांची मोठी पूजा झाली. त्याला ‘सारहुल’ पूजा असे म्हणतात. असंख्य जाती-जमाती एकत्र येऊन बुद्ध वृक्षांचा हा उत्सव साजरा करतात. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील शाल वृक्षाची पूजा केली. मध्यप्रदेशमध्ये सुद्धा शाल आणि पिंपळ वृक्षाची ‘सारना’ पूजा झाली. थोडक्यात बौद्ध परंपरा आजही भारतात आदिवासींमध्ये, अनेक जाती-जमातीमध्ये टिकून आहेत. प्रचलित आहेत. चैत्र महिन्यात जेंव्हा शाल वृक्षाला फुले येतात तेव्हा नवीन वर्ष सुरू झाल्याचे ओरिसा, झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये मानले जाते. अशा या शाल वृक्षाला मी त्रिवार वंदन करतो.
लेखक:-संजय सावंत.